मागच्या आठवड्यात एक वेगळाच अनुभव आला. खरं तर आजकालच्या काळात हा अनुभव बऱ्याच लोकांना येताना दिसतो पण माझ्यासाठी मात्र हा नवीन होता. आणि त्या निमित्तानी अनेक अंगांनी मनात खळबळ उडाली.
रोज सकाळसारखी मी माझ्या मुलीला शाळेत सोडून office ला जायला निघाले. एक podcast ऐकत अगदी नेहेमीच्याच रस्त्याने शांतपणे जात होते. हा रास्ता गावातला असल्यामुळे त्यावर speed limit तशी अगदी कमी होती. सकाळची गर्दीची वेळ असली तरी या रस्त्याला मला रोज फार गर्दी लागत नाही. मला एका चौकात उजवीकडे वळायचे होते. माझ्या पुढच्या 3-4 गाड्या सिग्नलची वाट बघत उभ्या होत्या त्यांच्या मागे मी गाडी थांबवली आणि निघण्याची वाट बघायला लागले. मी शांतपणे गाडीत बसलेले असताना गाडीला एकदम मागून जोरात धडक बसली. मला एक हादरा बसला. 1-2 सेकंद काही कळलेच नाही आणि एकदम लक्षात आले की मागच्या गाडीने धडक मारली आहे. मी एकदम शॉक मध्ये जरी असले तरी सगळे विचार उत्तम आणि एकदम वेगाने चालू होते.
पहिले माझ्या लक्षात आले की मला एक accident जरी झाला असला तरी मला अजिबात काहीही लागलेले नाही. म्हणजे गाडीचे जर काही नुकसान झाले असेल तर ते सोडून आपण एकदम ठीक आहोत. मी काही सेकंद शांत राहून मग पहिल्यांदा गाडीचे पार्किंग light लावले कारण माझी गाडी रस्त्याच्या बरीचशी कडेला जरी असली तरी काहीशी मधेच पण होती. मग गाडी बंद करून मागून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन मी गाडीतून खाली उतरले आणि sidewalk वर जाऊन उभी राहिले.
आधी मी गाडीच्या मागे जाऊन गाडीला काय झालं आहे त्याची तपासणी करायला लागले. वर वर बघता तर गाडीला काहीच झाले नव्हते. खाली रस्त्यावर काही प्लास्टिकचे तुकडे पडलेले दिसले ते पण मागच्या गाडीचे असावेत असेच वाटले. अशा accident च्या प्रसंगात लगेच गाड्या हलवायाच्या नसतात हे मला माहित होते त्यामुळे मी घाई न करता आधी दोन्ही गाड्यांचे फोटो काढले. टक्कर झाली असेल त्या भागाचे closeup फोटो काढले. मागच्या गाडीच्या नंबर प्लेटचे फोटो काढताना उगीचच मनात आपण हे फोटो उघडपणे काढावेत का नाही वगैरे शंका येऊ लागल्या. पण जे झालं ते document करणं जरुरी होतं.
एरवी रस्यावरून गाडी चालवताना अनेक वेळा असे accident झालेले दिसतात आणि अशा प्रसंगी आपण सुरक्षिततेच्या आणि कायद्याच्या दृष्टीने नक्की काय काय करायचे असते याबाबत मला अर्धवट माहिती होती. योगायोगाने एक आठवडा आधी एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला, तेजसला, याबाबत विचारलं आणि त्यावर आमचं discussion झालं होतं. असा प्रसंग कधी आलाच तर "आता मला काही माहित नाही" म्हणून तेजसला फोन करायची वेळ येऊ नये आणि मला काय काय करायचं ते माहिती पाहिजे असा या सगळ्याचा उद्देश होता. असं एकच आठवडा आधी माझ्या डोक्यात का आलं? माहित नाही! पण या वेळी असा प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर डोक्यात विचार आला की आपण आता यासाठी एकदम तयार आहोत.
एव्हाना माझ्या मागच्या गाडीतला माणूस पण गाडीतून उताराला होता. एकीकडे वाटलं आधी जाऊन मागच्या माणसाला जाब विचारावा, भांडण करावं. पण तसं न करता मी त्याच्यापाशी जाऊन त्याला विचारलं, "Are you ok? or hurt anywhere?" तो नाही म्हणाला. मग protocol प्रमाणे मी त्याला त्याचा insurance दाखवायला सांगितला. तो आणायला तो माणूस त्याच्या गाडीपाशी गेला. आता माझ्या लक्षात आलं की एव्हाना माझे हात थरथरायला लागले होते. आपल्याला काहीच झालं नाही असं वाटत असताना आता एकदम असे हात का कापायला लागले ते कळेना. मनात तेजस बरोबरचे discussion आठवू लागले. फोटो काढून झाले. एव्हाना मागच्या गाडीतला माणूस insurance घेऊन आला होता, त्याचे सगळे फोटो काढून झाले. आता पुढे काय करायचे?
आणि डोकं एकदम blank झालं. त्यादिवशीच्या सगळ्या discussion मधलं काहीच आठवेना. कदाचित मी थोडी शॉक मध्ये होते त्याचा परिणाम असावा. खरं तर आता जरूरीपुरतं सगळं करून झालं आहे तेव्हा आधी पहिली गोष्ट म्हणजे इथून निघून जावं असच वाटत होतं पण नंतर एखादी information घ्यायची राहिली असं व्हायला नको म्हणून सगळे सोपस्कार करणे भाग होतं. पण डोकं इतकं blank झाल्यावर काहीच सुचेना. शेवटी confident independent, self sufficient, modern स्त्रीचा सगळा विचार बाजूला ठेवला आणि न राहवून मी तेजस ला कॉल केला. त्याच्याशी बोलल्यावर जरा एकदम हलकं वाटलं. त्यानी सांगितलेल्या अजून काही गोष्टी पार पाडल्या.
पुन्हा एकदा मागच्या गाडीतल्या माणसाचं insurance card पाहिलं आणि confirm करायला त्याला विचारलं की यावर दिसतं आहे तेच तुझं नाव आहे का? त्यावर तो म्हणाला, "माझं नाव insurance मध्ये add केलं आहे पण अजून card वर दिसत नाहीये. तर जरा थांब मी आईला विचारतो."
आणि मी एकदम चमकले. आईला काय विचारतो? म्हणजे मी जसा तेजसला कॉल केला तसा तो बायकोला विचारतो म्हणाला असता तर मला काही वाटलं नसतं. पण आईला विचारतो? मग मी त्याच्याकडे नीट बघितल्यावर एव्हाना माझ्या अजिबात लक्षात न आलेली गोष्ट मला जाणवली. हा माणूस 6 फूट उंचीचा मोठा माणूस दिसत असला तरी हा एक teenager मुलगा आहे. माझ्या मनाला जसा धक्का बसला आहे तसाच तो पण जरा गोंधळलेला दिसला. कुठेतरी आपली चूक झाली असे जाणवून तो शरमल्यासारखा वाटला. Confidently सगळं handle करत असल्याच्या अविर्भावात तो पण घाबरलेला वाटला. त्याबरोबर त्याला काही सुनावावे अशी सगळी इच्छा गाळून पडली आणि मनात वेगळ्याच विचारांची गर्दी झाली.
या वर्षीच माझ्या मुलाने आरवने teenage मध्ये पदार्पण केले आहे. आणि एकूणच गाड्यांबद्दल आकर्षण असल्याने मी अजून 3-4 वर्षातच गाडी चालवू लागेन अशी स्वप्ने तो पाहू लागला आहे. मन नको नको म्हणत असताना मला त्या मागच्या गाडीतल्या मुलाच्या जागी एकदम आरव दिसू लागला. तो असा नवीन गाडी चालवू लागल्यावर त्याच्या हातून चुकून असं काही झालं तर? आत्ता तो मुलगा जसा त्याच्या आईला फोन करत आहे तसा जर एके दिवशी मला आरवचा फोन आला तर? या विचाराने माझे हातपाय अजूनच थंड पडले. आत्ता त्या मुलाची आई घरी काय विचार करत असेल? ती आत्ता त्याच्या जवळ नाही, मुलं मोठी झाल्यावर पालक असे सतत, प्रत्येक प्रसंगात त्यांच्या बरोबर असणारच नाहीत. अशा वेळी आत्ता तो मुलगा स्वतःच्या चुकीची जबाबदारी स्वतः घेऊ बघत आहे तर त्यात मी त्याच्यावर अजून माझी भीती आणि मुख्य म्हणजे राग ओकण्यात काही अर्थ नाही. देव न करो पण उद्या जर असा प्रसंग आरववर आला तर त्याला दुसऱ्या व्यक्तींनी ज्या kindness आणि respect नी वागवलं पाहिजे असं मला वाटतं तसं मी या मुलाबरोबर वागायला हवं. त्याची चूक नक्की झाली आहे आणि त्याची जी काही पैशाची किंवा अनुभवाची किंमत त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मोजावी लागेल ती ते मोजतीलच. पण या प्रसंगी आमच्या दोघात मी adult आहे त्यामुळे थोडं जास्त सामंजस्याने वागणे ही माझी जबाबदारी आहे. अशा अनेक विचारांचे वादळ मनात उठले होते.
अर्थात एकीकडे शेवटी हा एक अनोळखी मुलगा आहे आणि या प्रसंगी कायद्याच्या दृष्टीने योग्य त्या सगळ्या गोष्टी करणे खूप महत्वाचे होते. नंतर insurance चूक कोणाची या बाबत चौकशी करेल त्यात मी भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी बोलून बसले असले उद्योगही मला करायचे नव्हते. त्यामुळे एकीकडे मी शॉक मधून सावरणे, दुसरीकडे उगीचच मनात आलेली आरवची काळजी, या मुलाबरोबर kindly वागण्याची मीच ओढवून घेतलेली जबाबदारी आणि आपल्या kindness चा नंतर गैरफायदा घेतला जाऊन मीच गोत्यात येऊ नये याची धडपड अशा अतिशय mix भावनांमध्ये गटांगळ्या खात शेवटी सगळे सोपस्कार पुरे झाले. आता गाडी हलवून आपापल्या मार्गाने गेले तरी चालेल अशी वेळ आल्यावर शेवटी न राहवून मी त्या मुलाला परत एकदा, "Are you ok? Now drive safe." म्हणाले आणि माझ्या मार्गाला लागले.
थोडं पुढे येऊन एका सुरक्षित जागी गाडी पार्क करून थोडं पाणी प्यायले. परत तेजसशी शांतपणे बोलल्यावर जरा बरं वाटलं. मग पुन्हा एकदा गाडीचे नीट निरीक्षण केल्यावर आधी न दिसलेला गाडीचा एक भाग चेपलेला दिसला. म्हणजे आता हे सगळं निस्तरणं आलं. पण आत्ता लगेच यासाठी काहीही करायची गरज नाही असा विचार केला. आता आपण परत नेहमीसारख्या mood मध्ये आलो आहोत असं वाटून मी office मध्ये आले. आता त्या धक्क्यातून बाहेर आले असले तरी तो अख्खा दिवस मात्र मी काहीशा बधिर मनस्थितीत घालवला. मगाशी ज्या विचारांचं वादळ उठलं होतं ते सगळे विचार परत परत वेगवेगळ्या क्रमाने मनात घोंगावत राहिले.
दुपारी एकदम लक्षात आलं की सकाळी अनेक फोटो काढले त्यात त्या मुलाच्या driving license चा पण फोटो काढला होता. तो काढून सहज पहिला तेव्हा कळलं की तो मुलगा साडेसतरा वर्षांचा होता. म्हणजे officially अजून adult पण नाही. त्याला जेमतेम 4 महिन्यांपूर्वी license मिळालं होतं. सहज त्याच्या birthdate कडे लक्ष गेलं आणि काय आश्चर्य! त्याची आणि माझी birthdate exactly same! हा काय योगायोग आहे याने तर मी अजूनच बुचकळ्यात पडले. आता योगायोग म्हणलं की त्याचा अर्थच असा आहे की त्याला काही logic नाही. पण असे accident झालेल्या दोन्ही व्यक्तींचे वाढदिवस सारखे असणे किती वेळा होत असेल? मी एरवी अत्यंत logical विचार करणारी मुलगी आहे. पण माझ्या भांबावलेल्या स्थितीत, "या योगायोगाचा अजून काही अर्थ असेल का?" हा विचार मनातून काही जाईना.
मी इतकी वर्ष गाडी चालवत आहे तरी असं काहीतरी पहिल्यांदाच घडलं. मी एकदम safe driving करते. आणि या प्रसंगात तर माझी काही चूकही नव्हती. पण तरी या सगळ्यामुळे मनातून मी एकदम सावध झाले. एरवी गाडीत काहीतरी ऐकत असते, ते pause करणे, skip करणे असल्या गोष्टी केल्या जातात. गाडी चालवणे ही आता एक प्रतिक्षिप्त क्रिया झाली आहे. या निमित्तानी मी माझ्या मनाशी ठरवून टाकलं की मी अजून जास्त consciously गाडी चालावीन. या योगायोगाचा माझ्यापुराता मी हा अर्थ लावला आणि मग मानाचं काहीसं समाधान झालं.
दोन दिवसांनी सहज ऑफिस मध्ये मी हा प्रसंग सांगितला. त्यावर माझा बॉस मला म्हणाला, "या योगायोगाचा विचार करायचाच झाला तर त्याचा अर्थ तुझ्यापेक्षा त्या मुलाच्या आयुष्यात फार जास्त असू शकेल. गाडी चालवायला लागल्यावर केवळ चार महिन्यात त्याच्या आयुष्यात असा accident झाला. त्यात त्याला काही लागलं नाही गाडीचं फार नुकसान झालं नाही. पण तो त्या अनुभवातून गेला. त्यामुळे college graduation च्या दिवशी बेफिकीर आनंदात, दारू पिऊन गाडी चालवत जर त्याचा accident व्हायायचा chance असता तर आता तो chance एकदमच कमी आहे." हे ऐकल्यावर एकदम सगळ्याचा अर्थ लागला असं वाटलं. मी असा विचारच केला नव्हता.
अर्थात या सगळ्या जर, तर ला काही logic नाही. पण हे जे सगळं झालं त्याला तरी कुठे logic आहे? मुळात accident लाच काही logic नाही. त्यामुळे या प्रसंगानंतर मी गाडी चालवताना उगीच मधेच podcast बदल, गाणी शोध असले उद्योग न करता जे हवं आहे ते आधी शोधून मग गाडी चालवायला लागले आहे. आणि तो मुलगा पण या अनुभवातून शिकला असेल आणि पुढे कायम तो एक safe driver बनेल असा मी माझ्यापुरता विचार करते आहे.
नंतर काही दिवसांनी मी माझ्या दोन्ही मुलांना एकदा हे सगळं सांगितलं. त्यावर आधी त्यांच्या सगळ्या शंकांची उत्तरे आणि मग safe driving वर एक चर्चासत्र पार पडलं. अर्थात कुठल्याही प्रसंगानंतर आपल्या मुलांची शाळा घ्यायची हा आयांचा अत्यंत आवडता छंद असतोच आणि तो मी नेहेमीप्रमाणे मनसोक्त पार पडला.
Excelente, Pharach Chhan.
ReplyDeleteप्रसंग आणि त्याच्या अर्थाचे अनेक पदर हळूहळू उलगडत आपल्यासमोर येतात. वा!
असंच लिहीत जा. आता voice to text मुळे लिहिणं सोपं झालं आहे.