Friday, February 14, 2025

एक अनुभव


मागच्या आठवड्यात एक वेगळाच अनुभव आला. खरं तर आजकालच्या काळात हा अनुभव बऱ्याच लोकांना येताना दिसतो पण माझ्यासाठी मात्र हा नवीन होता. आणि त्या निमित्तानी अनेक अंगांनी मनात खळबळ उडाली. 

रोज सकाळसारखी मी माझ्या मुलीला शाळेत सोडून office ला जायला निघाले. एक podcast ऐकत अगदी नेहेमीच्याच रस्त्याने शांतपणे जात होते. हा रास्ता गावातला असल्यामुळे त्यावर speed limit तशी अगदी कमी होती. सकाळची गर्दीची वेळ असली तरी या रस्त्याला मला रोज फार गर्दी लागत नाही. मला एका चौकात उजवीकडे वळायचे होते. माझ्या पुढच्या 3-4 गाड्या सिग्नलची वाट बघत उभ्या होत्या त्यांच्या मागे मी गाडी थांबवली आणि निघण्याची वाट बघायला लागले. मी शांतपणे गाडीत बसलेले असताना गाडीला एकदम मागून जोरात धडक बसली. मला एक हादरा बसला. 1-2 सेकंद काही कळलेच नाही आणि एकदम लक्षात आले की मागच्या गाडीने धडक मारली आहे. मी एकदम शॉक मध्ये जरी असले तरी सगळे विचार उत्तम आणि एकदम वेगाने चालू होते.

पहिले माझ्या लक्षात आले की मला एक accident जरी झाला असला तरी मला अजिबात काहीही लागलेले नाही. म्हणजे गाडीचे जर काही नुकसान झाले असेल तर ते सोडून आपण एकदम ठीक आहोत. मी काही सेकंद शांत राहून मग पहिल्यांदा गाडीचे पार्किंग light लावले कारण माझी गाडी रस्त्याच्या बरीचशी कडेला जरी असली तरी काहीशी मधेच पण होती. मग गाडी बंद करून मागून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन मी गाडीतून खाली उतरले आणि sidewalk वर जाऊन उभी राहिले.  

आधी मी गाडीच्या मागे जाऊन गाडीला काय झालं आहे त्याची तपासणी करायला लागले. वर वर बघता तर गाडीला काहीच झाले नव्हते. खाली रस्त्यावर काही प्लास्टिकचे तुकडे पडलेले दिसले ते पण मागच्या गाडीचे असावेत असेच वाटले. अशा accident च्या प्रसंगात लगेच गाड्या हलवायाच्या नसतात हे मला माहित होते त्यामुळे मी घाई न करता आधी दोन्ही गाड्यांचे फोटो काढले. टक्कर झाली असेल त्या भागाचे closeup फोटो काढले. मागच्या गाडीच्या नंबर प्लेटचे फोटो काढताना उगीचच मनात आपण हे फोटो उघडपणे काढावेत का नाही वगैरे शंका येऊ लागल्या. पण जे झालं  ते document करणं जरुरी होतं. 

एरवी रस्यावरून गाडी चालवताना अनेक वेळा असे accident झालेले दिसतात आणि अशा प्रसंगी आपण सुरक्षिततेच्या आणि कायद्याच्या दृष्टीने नक्की काय काय करायचे असते याबाबत मला अर्धवट माहिती होती. योगायोगाने एक आठवडा आधी एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला, तेजसला, याबाबत विचारलं आणि त्यावर आमचं discussion झालं होतं. असा प्रसंग कधी आलाच तर "आता मला काही माहित नाही" म्हणून तेजसला फोन करायची वेळ येऊ नये आणि मला काय काय करायचं ते माहिती पाहिजे असा या सगळ्याचा उद्देश होता. असं एकच आठवडा आधी माझ्या डोक्यात का आलं? माहित नाही! पण या वेळी असा प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर डोक्यात विचार आला की आपण आता यासाठी एकदम तयार आहोत. 

एव्हाना माझ्या मागच्या गाडीतला माणूस पण गाडीतून उताराला होता. एकीकडे वाटलं आधी जाऊन मागच्या माणसाला जाब विचारावा, भांडण करावं. पण तसं न करता मी त्याच्यापाशी जाऊन त्याला विचारलं, "Are you ok? or hurt anywhere?" तो नाही म्हणाला. मग protocol  प्रमाणे मी त्याला त्याचा insurance दाखवायला सांगितला. तो आणायला तो माणूस त्याच्या गाडीपाशी गेला. आता माझ्या लक्षात आलं की एव्हाना माझे हात थरथरायला लागले होते. आपल्याला काहीच झालं नाही असं वाटत असताना आता एकदम असे हात का कापायला लागले ते कळेना. मनात तेजस बरोबरचे discussion आठवू लागले. फोटो काढून झाले. एव्हाना मागच्या गाडीतला माणूस insurance घेऊन आला होता, त्याचे सगळे फोटो काढून झाले. आता पुढे काय करायचे? 

आणि डोकं एकदम blank झालं. त्यादिवशीच्या सगळ्या discussion मधलं काहीच आठवेना. कदाचित मी थोडी शॉक मध्ये होते त्याचा परिणाम असावा. खरं तर आता जरूरीपुरतं सगळं करून झालं आहे तेव्हा आधी पहिली गोष्ट म्हणजे इथून निघून जावं असच वाटत होतं पण नंतर एखादी information घ्यायची राहिली असं व्हायला नको म्हणून सगळे सोपस्कार करणे भाग होतं. पण डोकं इतकं blank झाल्यावर काहीच सुचेना. शेवटी confident independent, self sufficient, modern स्त्रीचा सगळा विचार बाजूला ठेवला आणि न राहवून मी तेजस ला कॉल केला. त्याच्याशी बोलल्यावर जरा एकदम हलकं वाटलं. त्यानी सांगितलेल्या अजून काही गोष्टी पार पाडल्या. 

पुन्हा एकदा मागच्या गाडीतल्या माणसाचं insurance card पाहिलं आणि confirm करायला त्याला विचारलं की यावर दिसतं आहे तेच तुझं नाव आहे का? त्यावर तो म्हणाला,  "माझं नाव insurance मध्ये add केलं आहे पण अजून card वर दिसत नाहीये. तर जरा थांब मी आईला विचारतो." 

आणि मी एकदम चमकले. आईला काय विचारतो? म्हणजे मी जसा तेजसला कॉल केला तसा तो बायकोला विचारतो म्हणाला असता तर मला काही वाटलं नसतं. पण आईला विचारतो? मग मी त्याच्याकडे नीट बघितल्यावर एव्हाना माझ्या अजिबात लक्षात न आलेली गोष्ट मला जाणवली. हा माणूस 6 फूट उंचीचा मोठा माणूस दिसत असला तरी हा एक teenager मुलगा आहे. माझ्या मनाला जसा धक्का बसला आहे तसाच तो पण जरा गोंधळलेला दिसला. कुठेतरी आपली चूक झाली असे जाणवून तो शरमल्यासारखा वाटला. Confidently सगळं handle करत असल्याच्या अविर्भावात तो पण घाबरलेला वाटला. त्याबरोबर त्याला काही सुनावावे अशी सगळी इच्छा गाळून पडली आणि मनात वेगळ्याच विचारांची गर्दी झाली. 

या वर्षीच माझ्या मुलाने आरवने teenage मध्ये पदार्पण केले आहे. आणि एकूणच गाड्यांबद्दल आकर्षण असल्याने मी अजून 3-4 वर्षातच गाडी चालवू लागेन अशी स्वप्ने तो पाहू लागला आहे. मन नको नको म्हणत असताना मला त्या मागच्या गाडीतल्या मुलाच्या जागी एकदम आरव दिसू लागला. तो असा नवीन गाडी चालवू लागल्यावर त्याच्या हातून चुकून असं काही झालं तर? आत्ता तो मुलगा जसा त्याच्या आईला फोन करत आहे तसा जर एके दिवशी मला आरवचा फोन आला तर? या विचाराने माझे हातपाय अजूनच थंड पडले. आत्ता त्या मुलाची आई घरी काय विचार करत असेल? ती आत्ता त्याच्या जवळ नाही, मुलं मोठी झाल्यावर पालक असे सतत, प्रत्येक प्रसंगात त्यांच्या बरोबर असणारच नाहीत. अशा वेळी आत्ता तो मुलगा स्वतःच्या चुकीची जबाबदारी स्वतः घेऊ बघत आहे तर त्यात मी त्याच्यावर अजून माझी भीती आणि मुख्य म्हणजे राग ओकण्यात काही अर्थ नाही. देव न करो पण उद्या जर असा प्रसंग आरववर आला तर त्याला दुसऱ्या व्यक्तींनी ज्या kindness आणि respect नी वागवलं पाहिजे असं मला वाटतं तसं मी या मुलाबरोबर वागायला हवं. त्याची चूक नक्की झाली आहे आणि त्याची जी काही पैशाची किंवा अनुभवाची किंमत त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मोजावी लागेल ती ते मोजतीलच. पण या प्रसंगी आमच्या दोघात मी adult आहे त्यामुळे थोडं जास्त सामंजस्याने वागणे ही माझी जबाबदारी आहे. अशा अनेक विचारांचे वादळ मनात उठले होते. 

अर्थात एकीकडे शेवटी हा एक अनोळखी मुलगा आहे आणि या प्रसंगी कायद्याच्या दृष्टीने योग्य त्या सगळ्या गोष्टी करणे खूप महत्वाचे होते. नंतर insurance चूक कोणाची या बाबत चौकशी करेल त्यात मी भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी बोलून बसले असले उद्योगही मला करायचे नव्हते. त्यामुळे एकीकडे मी शॉक मधून सावरणे, दुसरीकडे उगीचच मनात आलेली आरवची काळजी, या मुलाबरोबर kindly वागण्याची मीच ओढवून घेतलेली जबाबदारी आणि आपल्या kindness चा नंतर गैरफायदा घेतला जाऊन मीच गोत्यात येऊ नये याची धडपड अशा अतिशय mix भावनांमध्ये गटांगळ्या खात शेवटी सगळे सोपस्कार पुरे झाले. आता गाडी हलवून आपापल्या मार्गाने गेले तरी चालेल अशी वेळ आल्यावर शेवटी न राहवून मी त्या मुलाला परत एकदा, "Are you ok? Now drive safe." म्हणाले आणि माझ्या मार्गाला लागले. 

थोडं पुढे येऊन एका सुरक्षित जागी गाडी पार्क करून थोडं पाणी प्यायले. परत तेजसशी शांतपणे बोलल्यावर जरा बरं वाटलं. मग पुन्हा एकदा गाडीचे नीट निरीक्षण केल्यावर आधी न दिसलेला गाडीचा एक भाग चेपलेला दिसला. म्हणजे आता हे सगळं निस्तरणं आलं. पण आत्ता लगेच यासाठी काहीही करायची गरज नाही असा विचार केला. आता आपण परत नेहमीसारख्या mood मध्ये आलो आहोत असं वाटून मी office मध्ये आले. आता त्या धक्क्यातून बाहेर आले असले तरी तो अख्खा दिवस मात्र मी काहीशा बधिर मनस्थितीत घालवला. मगाशी ज्या विचारांचं वादळ उठलं होतं ते सगळे विचार परत परत वेगवेगळ्या क्रमाने मनात घोंगावत राहिले. 

दुपारी एकदम लक्षात आलं की सकाळी अनेक फोटो काढले त्यात त्या मुलाच्या driving license चा पण फोटो काढला होता. तो काढून सहज पहिला तेव्हा कळलं की तो मुलगा साडेसतरा वर्षांचा होता. म्हणजे officially अजून adult पण नाही. त्याला जेमतेम 4 महिन्यांपूर्वी license मिळालं होतं. सहज त्याच्या birthdate कडे लक्ष गेलं आणि काय आश्चर्य! त्याची आणि माझी birthdate exactly same! हा काय योगायोग आहे याने तर मी अजूनच बुचकळ्यात पडले. आता योगायोग म्हणलं की त्याचा अर्थच असा आहे की त्याला काही logic नाही. पण असे accident झालेल्या दोन्ही व्यक्तींचे वाढदिवस सारखे असणे किती वेळा होत असेल? मी एरवी अत्यंत logical विचार करणारी मुलगी आहे. पण माझ्या भांबावलेल्या स्थितीत, "या योगायोगाचा अजून काही अर्थ असेल का?" हा विचार मनातून काही जाईना.

मी इतकी वर्ष गाडी चालवत आहे तरी असं काहीतरी पहिल्यांदाच घडलं. मी एकदम safe driving करते. आणि या प्रसंगात तर माझी काही चूकही नव्हती. पण तरी या सगळ्यामुळे मनातून मी एकदम सावध झाले. एरवी गाडीत काहीतरी ऐकत असते, ते pause करणे, skip करणे असल्या गोष्टी केल्या जातात. गाडी चालवणे ही आता एक प्रतिक्षिप्त क्रिया झाली आहे. या निमित्तानी मी माझ्या मनाशी ठरवून टाकलं की मी अजून जास्त consciously गाडी चालावीन. या योगायोगाचा माझ्यापुराता मी हा अर्थ लावला आणि मग मानाचं काहीसं समाधान झालं.  

दोन दिवसांनी सहज ऑफिस मध्ये मी हा प्रसंग सांगितला. त्यावर माझा बॉस मला म्हणाला, "या योगायोगाचा विचार करायचाच झाला तर त्याचा अर्थ तुझ्यापेक्षा त्या मुलाच्या आयुष्यात फार जास्त असू शकेल. गाडी चालवायला लागल्यावर केवळ चार महिन्यात त्याच्या आयुष्यात असा accident झाला. त्यात त्याला काही लागलं नाही गाडीचं फार नुकसान झालं नाही. पण तो त्या अनुभवातून गेला. त्यामुळे college graduation च्या दिवशी बेफिकीर आनंदात, दारू पिऊन गाडी चालवत जर त्याचा accident व्हायायचा chance असता तर आता तो chance एकदमच कमी आहे." हे ऐकल्यावर एकदम सगळ्याचा अर्थ लागला असं वाटलं. मी असा विचारच केला नव्हता. 

अर्थात या सगळ्या जर, तर ला काही logic नाही. पण हे जे सगळं झालं त्याला तरी कुठे logic आहे? मुळात accident लाच काही logic नाही. त्यामुळे या प्रसंगानंतर मी गाडी चालवताना उगीच मधेच podcast बदल, गाणी शोध असले उद्योग न करता जे हवं आहे ते आधी शोधून मग गाडी चालवायला लागले आहे. आणि तो मुलगा पण या अनुभवातून शिकला असेल आणि पुढे कायम तो एक safe driver बनेल असा मी माझ्यापुरता विचार करते आहे. 

नंतर काही दिवसांनी मी माझ्या दोन्ही मुलांना एकदा हे सगळं सांगितलं. त्यावर आधी त्यांच्या सगळ्या शंकांची उत्तरे आणि मग safe driving वर एक चर्चासत्र पार पडलं. अर्थात कुठल्याही प्रसंगानंतर आपल्या मुलांची शाळा घ्यायची हा आयांचा अत्यंत आवडता छंद असतोच आणि तो मी नेहेमीप्रमाणे मनसोक्त पार पडला. 

Monday, January 23, 2023

मी, बाबा आणि कला

            आपल्या अतिशय जवळच्या व्यक्ती आपल्या आयुष्याचा एक मोठ्ठा भाग असतात. त्यांना बाजूला काढून त्यांचे आपल्या आयुष्यातले महत्त्व काय असा त्रयस्थपणे विचार करणं फारच अवघड जातं. पण कधी कधी वाटतं की त्यामुळे आपण हे नातं आणि त्याचा आपल्यावर झालेला परिणाम हे सगळं खूप गृहीत धरतो. इतक्या घट्ट नात्यात काही न बोलताही एकमेकांच्या मनात काय चालू आहे, एकमेकांचे विचार, मतं  हे सगळं बऱ्याच अंशी माहित असतं. पण तरी ते पुन्हा एकदा शब्दातून व्यक्त करायला काय हरकत आहे. जितक्या हक्काने "तुझी ही गोष्ट मला फारशी आवडली नाही" असं आपण एकमेकांना सांगतो तितक्याच हक्काने आणि प्रेमाने मला तुझ्यातल्या काय गोष्टी खूप भावतात हे शब्दात मांडलं पाहिजे असं मला वाटतं. 

            या 23 जानेवारीला माझ्या बाबाचा 70 वा वाढदिवस... त्या निमित्ताने त्याच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आणि मुख्य म्हणजे त्यांचा माझ्या जडणघडणीवर झालेला परिणाम शब्दात मांडायचा हा प्रयत्न. अर्थातच हे सगळं मम्मा आणि बाबाचं teamwork असल्यामुळे त्यात मी कोणाकडून काय घेतलं असं वेगळं काढणं खूप अवघड आहे. पण तरीही या निमित्ताने बाबाच्या मला खूप भावलेल्या काही गोष्टी... 


मी, बाबा आणि कला

            माझा बाबा हा व्यवसायाने डॉक्टर असला तरी मूळचा एक कलाकार आहे. एकूणच अनेक कलांवर त्याचे प्रचंड प्रेम आहे. कलानिर्मितीसाठी प्रतिभा जशी असायला लागते त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त सातत्याने कष्ट, सराव करायची तयारी लागते या विचारांवर त्याचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे सगळ्याच कलांकडे बघायची एक वेगळी दृष्टी त्याने लहानपणापासून आम्हाला दिली. त्याच बरोबर सगळ्या कला एकमेकांना पूरक असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करून पहिल्या पाहिजेत, चांगलं संगीत ऐकलं पाहिजे, सगळ्या visual arts डोळसपणे बघितल्या पाहिजेत, खूप तऱ्हेच्या performing arts बघितल्या पाहिजेत असा त्याचा आग्रह असे. 

            लहानपणी रविवारी संध्याकाळी आम्ही सगळे गावाबाहेरच्या डोंगरावर फिरायला जायचो. तिथे जातानाच चित्रकलेचा सगळं सामान घेऊ जायचो. तिथे डोंगरात बसून बाबा मला आणि माझ्या दादाला चित्र काढायला शिकवायचा. आजूबाजूचा निसर्ग बघून त्यातल्या एखाद्या गोष्टीचे चित्र तिथे डोंगरात बसून काढणे हा एक खूप छान अनुभव असायचा. सहजच proportions, perspective, वस्तूंचे रंग आणि ते कागदावर उतरवण्यासाठी लागणारे रंगपेटीतले रंग आणि त्यांची मिश्रणे यासारख्या असंख्य गोष्टी आम्ही अगदी मजेत शिकलो. मधेच मम्मानी आणलेल्या शेंगा, फुटाणे, अगदी पेप्सीकोला सुद्धा खाणे चालू असायचे. या सगळ्यात निसर्गाचे सानिध्य, मम्मा-बाबाचा सहवास, मोकळी हवा, डोंगर चढण्यासारखी शारीरिक क्रिया आणि मनसोक्त चित्र काढणे आणि रंगवणे असे सगळीकडूनच भरभरून मिळत असे. 

            लहानपणाच्या या सुखद आठवणी आणि मज्जा घेत काढलेली चित्र हे सगळं हाती लागलं कारण त्या वेळी बाबाने अतिशय डोळसपणे चित्रकलेची आणि आमची 'अशी' ओळख करून दिली. चित्रात किंवा एकूणच कुठल्याही कलेत चूक आणि बरोबर असं काही नसतं. त्या कलेचे म्हणून काही नियम जरूर असतील. पण तरीही शेवटी एखादी कलाकृती हे त्या कलाकाराचं त्याच्या विचारांनुसार मुक्तपणे व्यक्त होणं असतं. आणि म्हणूनच आपल्या कलेत आपण मोकळं असावं आणि दुसऱ्याची कलाकृती बघतानासुद्धा शक्य तितक्या non-judgmental, मोकळ्या मानाने बघावी, असा फार मोलाचा सल्ला मला लहानपणी मिळाला. त्याचा पुरता अर्थ जशी मोठी होत गेले तसा वेगवेगळ्या वेळी नव्याने कळत गेला. आणि तो सर्व अर्थाने जमायला तर कदाचित अजून काही काळ जावा लागेल. 

        मी आठवी- नववीत असताना चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. पहिली परीक्षा आठवीत दिली तेव्हा माझे आजोबा आजारी होते त्यामुळे बाबा माझ्या चित्रकलेच्या तयारीत फार लक्ष घालू शकला नाही. आपण चांगली चित्रे काढतो त्यामुळे आपल्याला एकदम छान grade मिळणार अशा विचारात मी होते. असे असताना शेवटी निकाल लागला तेव्हा मला अगदीच सामान्य grade  मिळाली. हे असं कसं काय झालं अशा कोड्यात मी पडले होते. नंतर नववीत जेव्हा दुसरी परीक्षा द्यायची वेळ आली तेव्हा माझा confidence जरा कमीच झाला होता. शाळेत चित्रकलेचे शिक्षक तयारी करून घेत होते पण अजून नेमकं काय करावं काळात नव्हतं. मग एकदा बाबा माझ्याबरोबर बसला. त्यानी माझी चित्रं पहिली आणि शाळेत काय तयारी चालू आहे त्याबद्दल चर्चा झाली. 

            त्यावेळी त्या परीक्षेत निसर्गचित्र म्हणून एक भाग असायचा. त्यात एखाद्या फुलाची डहाळी देत आणि ते बघून त्याचे चित्र काढायचे असे. परीक्षेचे सेंटर आमची शाळा असल्यामुळे आमच्या शाळेतल्या सरांना झेनियाच्या फुलाची डहाळी देणार वगैरे सर्व माहिती होती. त्यामुळे ते फळ्यावर झेनियाचे फूल कसे काढायचे ते काढून दाखवत आणि त्याचे शेडींग कसे करायचे ते खडूने करून दाखवत. सगळी मुले वहीत तस्सेच चित्र काढत. याप्रकारे शाळेतली तयारी चालू होती. 

            जेव्हा मी बाबाबरोबर घरी चित्रांचा सराव करू लागले तेव्हा बाबानी मला विचारले की, "तू कधी झेनियाचे फुल पहिले आहेस का?" मी म्हणाले, "नाही." त्यावर तो म्हणाला, " मग तुला आपण काय काढायचे आहे ते कसं कळणार? तुमच्या शाळेतल्या बागेत झेनियाची फुलं आहेत ती उद्या शाळेत गेल्यावर नीट बघ. त्याचे निरीक्षण कर. त्याच्या पाकळ्या कशा आहेत, त्या कशा जोडल्या गेल्या आहेत, त्याच्या देठ कसा आहे, पानांचे texture कसं आहे, हिरव्या रंगाच्या कुठल्या shades पानात दिसत आहेत हे सगळं नीट बघ." त्यानुसार मी दुसऱ्या दिवशी ती फुलं नीट बघितली. आणि एकूणच नंतर शाळेच्या मधल्या सुट्टीत अधून मधून त्या फुलांचे निरीक्षण करण्याचा नादच लागला. मग घरी बाबानी आमच्या बागेतल्या वेगवेगळ्या फुलांच्या डहाळ्या आणून, त्या समोर ठेवून बघत बघत कसं चित्र काढता येतं ते दाखवलं. ते फूल समोरूनच बघून त्याचं चित्र काढलं पाहिजे असं नाही तर त्याचा कोन बदलून, पूर्णपणे मागून, बाजूने किंवा भलत्याच कोनातून खालून असं कशाही प्रकारे काढता येतं ते दाखवलं. त्यावेळच्या परीक्षेत मला छान grade मिळाली. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यावेळी बाबाबरोबर केलेल्या सरावानंतर माझा चित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. 

            काही वेळा आपण एखादी कलाकृती निर्माण करत असताना आपणच आपल्याला मनातल्या मनात खूप judge करत असतो. त्यातून जर कला शिकवणारा शिक्षकच संकुचित दृष्टिकोनातून ती कला शिकवत असेल तर नक्की काय चूक आणि काय बरोबर याचा मनात खूप गोंधळ उडतो. त्यामुळे, "अगदी बाकीच्यांसारखेच चित्र काढून सगळ्यांनी छापाचे गणपती तयार करण्यापेक्षा तू तुझा विचार चित्रातून पोचव आणि तुझा वेगळेपणा त्यातून दिसू दे." हे त्यावेळचं बाबाचं म्हणणं मनावर अगदी कोरलं गेलं. 

            माझ्यातला कलाकार बाबानी घडवला, सगळ्या कालांकडे बघण्याची दृष्टी दिली, त्याच बरोबर एक पालक म्हणून तो अतिशय महत्वाची गोष्ट करत राहिला, अजूनही करत आहे, ते म्हणजे कलेबद्दल तो जे आम्हाला सागंत आला ते तो स्वतः करत आहे. एकतर तो अनेक कलांबद्दल अतिशय passionate आहे. त्यात सतत नवीन गोष्टी शिकत राहतो. कलाकृती करण्यामागे त्याच्या creative विचारांबरोबरच शास्त्रीय किंवा analytical विचार पण असतात आणि त्यामुळेच यात अजून काय करता येईल हा विचार सतत असतो. 

            अनेक कलांमध्ये त्याला स्वतःला रस आहे. कोलाज चित्रे, लाकडात कोरीवकाम, मातीकाम, फोटोग्राफी, murals, paintings, अशा अनेक प्रकारात तो डुंबून आला आहे. खूप वेगवेगळी माध्यमे त्याने हाताळून पहिली आहेत. सध्या बरीच वर्ष तो कोलाज चित्रात रमला आहे. माझे मम्मा-बाबा माझ्याकडे अमेरिकेत सुट्टीसाठी आले की त्या तेवढ्या काळात इथे मिळणारे वेगळ्या प्रकारचे foam sheets वापरून त्यानी San Francisco मधल्या Museum of Modern Art च्या इमारतीचे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे खूप सुंदर कोलाज चित्र केलं आहे. माझा मुलगा लहान असताना त्या चित्रातला काही भाग त्याला बरोबर घेऊन बाबानी केला. मी सुध्दा सुट्टीसाठी भारतात गेले तेव्हा काही ना काही कला डोक्यात घेऊन आणि त्याचे काही सामान अमेरिकेतून काही भारतातून घेऊन गेले. तेव्हा मी ते एकटीनेच केलं  असं कधीच झालं नाही. ती एक सगळ्या घरादाराची कला होऊन गेली. जिथे फारसं कुणी येत नाही अशा खोलीत सगळा पसारा मांडून सगळेजणं अधून मधून एकेकटे आणि बऱ्याचदा एकत्र असा आम्ही सगळ्यांनी खूप छान आणि productive वेळ घालवला. 

            एकूणच स्वभावाच्या बाबतीत मी आणि बाबा खूप सारखे आहोत आणि मुख्य साम्य म्हणजे दोघेही perfectionist आहोत. त्यामुळे अशाप्रकारे कलेत एकत्र मज्जा करताना माझे आणि बाबाचे विचार खूप जुळतात आणि दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे हे बऱ्याचदा न सांगताही कळते. अजून एक महत्वाचं म्हणजे मी काही कलाकृती करत असताना तो मदत करत असेल तरी त्यानी कायम मला lead करू दिलं. तो त्याचा एखादा वेगळा विचार सुचवतो पण तो मी तसाच करावा असा कधीही आग्रह धरत नाही. स्वतः एक उत्तम कलाकार असूनही त्या क्षणात निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य बाबा मला घेऊ देतो. आता मी जेव्हा माझ्या मुलांबरोबर काही कलाकृती करत असते तेव्हा ही गोष्ट अगदी लक्षात ठेवून करायचा माझा प्रयत्न असतो. अर्थात चुकून जरी मी माझा निर्णय किंचितही माझ्या मुलांवर लादत आहे असं त्यांना जाणवलं तर ती लगेच, "Mamma this is my art and I want to do it this way." असं सांगून मला लगेच जमिनीवर आणतात. 

            माझ्या लहानपणी TV वर दूरदर्शन वर तेव्हा भारतीय कालांबद्दलचा एक कार्यक्रम लागायचा. रविवारी रात्री तो खूप उशिरा चालू होत असला तरी आम्हाला तो जागून बघायची परवानगी होती. त्यात अनेक भारतीय वाद्ये, त्यांची विविधता, प्रकार, फरक अशी खूप ओळख झाली. बाबाला संगीतात पण खूप रस आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीताची खूप बारकाईने जाण पण आहे. बाबा तो कार्यक्रम बघताना एकीकडे त्या वाद्याबद्दलच्या आणि एकूणच संगीताबद्दलच्या खूप गोष्टी समजावून सांगत असे. 

            त्याच कार्यक्रमात अधूनमधून भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार पण दाखवले जात. मी अगदी लहान असल्यापासून एकूणच नाचाकडे खूप ओढली जायचे. त्यामुळे दुसरीत असल्यापासून मी शास्त्रीय नृत्यप्रकार शिकू लागले. पण अनेक कारणांनी मी नृत्य कधीच सलग शिकू शकले नाही. पण आपल्याला खूप शिकायला मिळावं ही इच्छा मनात कायमच होती. त्यातच एकदा आम्ही TV वरच्या त्या कार्यक्रमात ओडिसी नृत्य पहिले आणि आम्ही सगळेच मंत्रमुग्ध झालो. तोपर्यंत हा नृत्यप्रकार कधी फारसा पहिला नसल्याने त्याबद्दल काही माहित नव्हते. पण त्यातल्या लयदार हालचाली, postures, हावभाव, एका pose मधून दुसऱ्या pose मध्ये पाण्याच्या प्रवाहासारख्या वाहत जाणाऱ्या हालचाली हे सगळं वेगळेपण खूपच भावलं. हा नृत्यप्रकार मला कधी करायला मिळाला तर खूप छान होईल असं आम्हाला सगळ्यांनाच वाटलं. 

            त्यानंतर मध्ये खूप काळ गेला. मी कॉलेज, अभ्यास यात इतकी गुंतत गेले की नाचपासून अजूनच लांब लांब जात राहिले. आता काही आपल्याला हे शिकायला मिळत नाही अशी मनाची समजून झाली. त्यावेळी केवळ माझ्या मम्मा -बाबाला मात्र पक्का विश्वास होता की एक ना एक दिवस तुला ओडिसी नक्की शिकायला मिळणार. तोपर्यंत मी अमेरिकेत राहायला लागले होते. आजूबाजूला अशी नृत्य शिकायला मिळण्याची काहीही शक्यता नसताना ते दोघे कशाच्या भरवशावर एवढे ठाम आहेत याचं मला नेहमीच खूप आश्चर्य वाटायचं. पण खरचं माझ्या नशिबाने किंवा त्यांच्या इच्छाशक्तीनी मला पुढे ओडिसी शिकायला मिळालं आणि आता मी गेली काही वर्ष ओडिसी नृत्यप्रकार शिकत आहे. 

            खरं तर नाचाचं, माझं मम्मा बरोबर connection आहे. तिलाही नाचाची खूप आवड आहे. खूप आधी ती पण नृत्य शिकत होती आणि त्यानंतर कितीतरी वर्ष शाळेत gathering ला ती मुलांचे नाच बसवायची. त्यामुळे नृत्याबद्दल आमचे अनेक वेळा बोलणे होते. बाबा तशा अर्थाने कधी नृत्य शिकला नाहीये. तो काही प्रत्यक्ष नर्तकही नाही. पण त्याला असलेली संगीतातली जाण मला नेहेमीच खूप उपयोगी पडत आली आहे. संगीतातील ताल, त्या तालाच्या वेगवेगळ्या combinations आणि लयी, संगीतातील राग, त्या रागाचा mood, गाण्यातले शब्दांचे अर्थ आणि त्यानुसार होणारा अभिनय अशा अनेक गोष्टींबद्दल माझी आणि बाबाची नेहेमीच चर्चा होते. मला नृत्यातले बारकावे कळत असले तरी माझा विचार हा त्या एकाच दिशेनी होतो. त्यावेळी संगीतातल्या या अनेक वेगळ्या आणि नृत्याला अतिशय पूरक असलेल्या अंगांचा विचार मला सगळ्या बाजूंनी खूप समृद्ध करून जातो. 

            अर्थातच नृत्य, संगीत, चित्रकला, मातीकाम या सगळ्या कलांनी मला जे काही दिलं त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मला Architecture, Landscape architecture या माझ्या profession मध्ये खूप उपयोग होतो. "सगळ्या कला एकमेकांना पूरक आहेत" हे बाबाचं म्हणणं मला वारंवार पटतं. असा एक कलाकार मला बाबा म्हणून मिळाला, अजून काय पाहिजे? मी खूष!




Thursday, February 22, 2018

नवीन पिढी Smart की मागास?

       काही दिवसांपूर्वी मी एक blog post लिहिली. त्यात माझ्या 6 वर्षांच्या मुलाने मला विचारलेले काही कठीण प्रश्न आणि त्याची उत्तरे देताना माझ्या मनाचा उडालेला गोंधळ याबद्दल मी लिहिलं होतं. ते वाचून खूप जणांनी मला अभिप्राय पाठवला. आपल्या लिखाणाबद्दलचा अभिप्राय वाचायला मला नेहमीच आवडते. Thanks all for that. त्या अनेक comments मधला सामान धागा होता की, "आपल्या मुलांची ही नवीन पिढी अतिशय smart आहे. अनेक गोष्टींबद्दल ते सतत विचारतात आणि आपल्याला त्याची योग्य उत्तरे द्यावी लागतात. आपण आपल्या लहानपणी असे काही प्रश्न विचारलेले आठवत नाही." एरवीही जेव्हा काही मित्र मैत्रिणी एकत्र जमतात आणि आपापल्या मुलांचा विषय निघतो तेव्हा आजकालची मुले आपल्यापेक्षाही किती smart आहेत असा एक common चर्चेचा विषय असतो. 
       मला नेहमीच यावर काय बोलावं कळत नाही. मी या विचाराशी पूर्णतः सहमत नाही पण असहमत ही नाही त्यामुळे मी नेहमी गप्प बसते किंवा नुसतीच मान डोलावते. मला नेहमी वाटतं की प्रत्येकच पिढी तिच्या आधीच्या पिढीपेक्षा smart असते. प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये काळाचा एक overlap असतो. आणि काळरेषा बघता तो आधीच्या पिढीच्या शेवटी येतो तर नवीन पिढीच्या सुरुवातीला. भोवतालची परिस्थिती, जीवनपद्धती, नवीन तंत्रज्ञान, सामाजिक वैविध्य, अनेक नवीन विषयांचे exposure या सगळ्यामुळे एखाद्याच्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम होत असतो. आधीची पिढी लहानाची मोठी होत असताना या सगळ्या गोष्टी बदलत जातात आणि ते या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत, नवीन शिकत, घडत जातात. पण नवीन पिढीसाठी ही बदललेली परिस्थितीच starting point असल्यामुळे ते या परिस्थितीत चाचपडत नसून एकदम comfortable असतात. त्यामुळे ही नवीन पिढी आपल्यापेक्षा अधिक smart आहे असे वाटते.
       आजकालची मुले चारचौघात हुशारीने बोलतात, आपल्याला कोड्यात टाकणारे प्रश्न विचारतात याचे कारण आपणच त्यांना तशा प्रकारे निर्भीडपणे विचार करायला, व्यक्त व्हायला शिकवलेले आहे. आपल्या लहानपणी कित्येक घरांमधून मुलांसाठी जे नियम असत त्यांनी त्यांचा चौकसपणा मारला जात असे. मोठ्या माणसांना असे बोलू नये, या विषयावर प्रश्न विचारू नयेत असे सतत सांगितले जायचे. त्यामुळे आता आपली मुले अशी मनमोकळेपणानी वागली की त्याचे अप्रूप वाटते. 
       माझे पणजी पणजोबा वाईजवळच्या एका खेड्यात राहत असत. त्या काळी माझ्या आजोबांना 4 थी ची scholarship मिळाली म्हणून शिक्षणासाठी ते वाई सारख्या जरा मोठ्या गावात राहायला गेले आणि तिथेच आजोबांचे बालपण गेले. नोकरीच्या निमित्ताने माझे आजोबा पुण्यात राहिले आणि माझा बाबा तिथे मोठा झाला. मी आणि दादा दोघेही शिक्षण नोकरीच्या निमित्ताने दिल्ली, बंगलोर सारख्या आणखी मोठया शहरात राहिलो. आणि आता आमची मुले अमेरिकेत वाढत आहेत. प्रत्येक नवीन पिढी नवीन आणि अधिक मोठ्या गावाला राहायला गेली आणि त्यानिमित्ताने येणारे नवीन अनुभव घेत शहाणपणा शिकत गेली. आधीची पिढी नवीन शहरात, देशात चाचपडत, शिकत राहिली आणि त्यामानाने प्रत्येकाची मुले आहे त्या शहरात सरावून नवीन आव्हाने स्वीकारत नवीन ठिकाणी जात राहिली. प्रत्येक पिढीने नवीन शोध लावत, नवीन परिस्थितीशी जुळवून घेत, अधिकाधिक प्रगती करत पुढे जाणे हा निसर्गाचा नियम आहे. आदिमानवापासून ते आपल्यापर्यंत झालेल्या उत्क्रांतीमध्ये ते दिसून येते. 
       या सगळ्यात एक गोष्ट मात्र आपण नेहमी विसरतो की नवीन पिढी जसं नवीन काही शिकत आहे तसच जुनं काही मागेही टाकत आहे. प्रत्येक माणसाकडे स्वतःच्या मर्यादित आयुष्यात जर एक ठराविक माहितीचा साठा असेल तर नवीन शिकण्यासाठी जुन्या काही गोष्टी मागे सारल्या जातात. आजकाल सगळ्यांना वाटतं की लहान मुले smartphone, computer आणि एकूणच सगळे तंत्रज्ञान किती सहजतेने वापरतात. आपल्याला काही हे जमत नाही. पण आधीच्या पिढीने तितक्याच सहजतेने फोन, TV, oven, food processor वापरले आहेत. त्याच्या आधीच्या पिढीने गॅसची शेगडी, मिक्सर आणि त्याच्या आधीच्या पिढीने चूल आणि पाटा वरवंटा. आत्ताच्या पिढीला पाटा वरवंटा हातात दिला तर हा नेमका कशासाठी वापरायचा असतो हे सुद्धा कळणार नाही. आदिमानवने तर स्वतः हत्यारे बनवली आणि आग तयार केली. आपल्याला त्यासाठी hardware चे दुकान आणि आधुनिक पद्धतीने आपल्याआप पेटणारी गॅस ची शेगडी यावर अवलंबून रहावे लागते. आता याला नवीन पिढी खूप smart आहे म्हणावे की खूप मागास? 
       भारतातून अमेरिकेत राहायला आल्यावर माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. कशाला काय म्हणतात, उच्चर कसे करतात, कुठे कसे वागतात, सामाजिक किंवा सांस्कृतिक वेगळेपण या आणि अशासारख्या असंख्य गोष्टीत मी अजूनही चाचपडत असते आणि त्यातून सतत नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आता मुले शाळा, classes च्या निमित्ताने बाहेरच्या जगात जायला लागल्यापासून कित्येक नवीन गोष्टी मला त्यांच्या मार्फत कळायला लागल्या आहेत. आणि ही तर सुरुवात आहे. त्यांचं जग जसजसं मोठं होत जाईल तसतसं त्यांच्या ज्ञानात, अनुभवात नवीन भर पडत जाईल. त्यातल्या कित्येक गोष्टी माझ्यासाठी अगदी नवीन असणार आहेत आणि अजून खूप चाचपणं बाकी आहे. मुलं आपल्यापेक्षा smart वाटणार आहेत. पण चार पावसाळे जास्त पाहिल्यामुळे मला मिळालेलं शहाणपण त्यांना नसेल. मुलं अर्धी भारतीय आणि अर्धी अमेरिकन असली तरी अमेरिकेत वाढत असल्याने त्यांना भारतीय गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव नसेल. मी लहानाची मोठी होताना जे संदर्भ, व्यक्ती, चालीरीती मला भावल्या आणि त्यामुळे मी समृद्ध झाले त्यांची ओळख त्यांना नसेल. त्यामुळे मला वाटतं कोणती पिढी smart हे ठरवण्यापेक्षा काही कमीपणा किंवा भीती न बाळगता मुलांकडून नवीन गोष्टी शिकत राहणे आणि माझी पाळेमुळे जिथे जिथे जाऊन पोचली आहेत त्या सगळ्या जुन्या गोष्टींची त्यांना ओळख करून देणे एवढेच माझ्या हातात आहे. 

Tuesday, February 13, 2018

काही मूलभूत प्रश्न

      दुपारची वेळ होती. इवा (वय 2.5 वर्षे) दुपारची डुलकी काढत होती आणि आरव (वय 6 वर्षे) आतल्या खोलीत काहीतरी खेळत बसला होता. सकाळपासूनची घाई गडबड संपल्यावर आणि संद्याकाळची धांदल सुरु होण्यापूर्वीचा हा दुपारचा तासभर मी जरा निवांत झाले होते आणि TV वर detective serial बघत बसले होते. तेवढ्यात आरव तिथे आला. मी पटकन TV pause केला. Detective serial असल्यामुळे त्यातल्या सगळ्या गोष्टी त्यानी नाही पहिल्या तरी चालतील अशा असल्यामुळे मला चपळाई दाखवावी लागली. TV pause झाला तेव्हा त्यावर काही Tombstones चं चित्र होतं. आरवचं तिकडे लक्ष गेलं आणि तो मला म्हणाला, "Hey Mom, what's that?" 
      आता त्याला काय सांगावं अशा विचारात पडून मी नुसतंच म्हणाले , "Stone." त्यावर तो म्हणाला, "Is that Tombstone?" याला हे कसं काय माहिती या विचारात मी पडले असताना पुढचा प्रश्न आला, "Are dead people laying under that in the ground?" मी एकदम चपापले. याला नुसता तो शब्दच नाही तर पूर्ण संकल्पना माहिती आहे असं दिसतंय. तो अजून फक्त 6 वर्षांचा आहे. त्यामुळे मरण या विषयाबद्दल त्याच्याशी फार तपशीलवार बोलावं असं काही मला वाटेना. पण उगीच काहीतरी खोटं किंवा काल्पनिक सांगावं हेही पटत नव्हतं. म्हणून मग मी आवाज शक्य तितका normal ठेवत त्याला सहज एखाद्या विषयाबद्दल सांगावं तसं म्हणाले, "Yes, you are correct." लगेच आरव चा पुढचा प्रश्न, "So when I am 100 years old and I die am I going to lay like that under those kind of stones?" त्यावर मी म्हणाले, "No dear, we don't do that." मी पुढचं काही बोलायच्या आत आरव म्हणाला, " How about you? Will you have this stone when you die?" गाडी आता त्याच्या मरणावरून माझ्या मरणावर घसरली होती. "No....." मला पुढचं काही बोलू न देता त्यानी मला विचारलं, "You told me that my Grandma's parents are dead. So are they laying under the ground somewhere in India?" 
      आता हळूहळू त्याला उत्तर देणं मला कठीण होऊ लागलं होतं. त्याच्याशी अगदी सहज 'Matter of fact' पद्धतीनी बोलायचं असं ठरवलं असलं तरी माझ्या गेलेल्या आजी आजोबांबद्दल असं कोरडेपणाने बोलणं थोडं अवघड जात होतं. पण तरी त्याला योग्य ते उत्तर देणं गरजेचं होतं. मग मी म्हणाले, " That's what Christian people do. We are Hindus. We don't do that." मग मी त्यावर त्याला कसे वेगवेगळे धर्म असतात आणि त्यांच्या कशा वेगवेगळ्या पद्धती असतात असं अगदी थोडक्यात सांगितलं. त्यावर परत आरव म्हणाला, " What do we do after someone die?" त्यावर मी म्हणाले, "We do a process called Cremation." आणि एवढं बोलून आता 'त्याचा नेमका अर्थ काय?' हा प्रश्न त्यानी मला विचारू नये अशी मी मनातल्या मनात आशा करत राहिले. 
      तेवढ्यात त्यानी track बदलला आणि म्हणाला, "Where do people go after they die?" मग मी त्याला म्हणाले, "Different people have different opinion about that. Some think they reincarnate, some think they go to some place nice, some think they just stop living. But the truth is no one exactly knows what happens after the death."
      इतका वेळ त्याच्या सगळ्या शंकांना उत्तरं देत असताना मनात कुठेतरी गोंधळ उडाला होता. आपण हे बरोबर करतोय ना? असं 6 वर्षाच्या मुलाबरोबर मरणाविषयी बोलणं कितपत योग्य आहे? हे प्रश्न टाळणं तरी किती योग्य आहे? 'मरण' याचा खरा अर्थ कळण्याचं त्याचं वय नाही आणि त्याच्या सुदैवाने त्याला तसा काही अनुभवही नाही. त्याला आत्ता कळली ती फक्त माहिती. पण या सगळ्या चर्चेनंतर उगीचच तो अकाली मोठा झाला असं व्हायला नको. अशा सगळ्या शंका मनात येत होत्या. 
      माझ्यासमोर आता पुढचा प्रश्न काय येणार या विचारात मी होते. त्याच्याबरोबर आधी मरणाबद्दल आणि नंतर धर्माबद्दल चर्चा चालू आहे म्हणजे आता बहुतेक पुढचा मुद्दा आत्मिक परिवर्तन किंवा मग राजकारण असणार असा माझा अंदाज होता. त्यावर आरव म्हणाला, " Hey Mom, do you know the 1st Spin-ji-tsu master is dead and he gave me his sward because I am a Ninja. There are Ninja letters on my sward saying that this sward belonged to him and he gave it to me. He is dead now and he is laying in the ground under the tombstone. Also Mom, do you know he is holding a Crystal in his hand." असं म्हणून आरवनी मग मला तो कोण तो 1st Spin-ji-tsu master त्याच्या कबरीत तो Crystal हातात घेऊन कसा मेला आहे हे अगदी यथासांग प्रात्यक्षिक करून दाखवलं. Lego Ninjago movie आल्यापासून आमच्या घरात हे सगळं Ninja चं वारं वाहतंय हे वेगळं सांगायला नकोच. 
      आरव पुढे म्हणाला, "Do you know Mom, there is water and some sparkling things and the crystal is right in the middle of it... And it has power to defeat the Ghost.... 1st Spin-ji-tsu master hid the Golden weapon and...... Hey Mom, You know I have a Ninja sward and I can defeat the Ghost. And Mom, why did you not tell me that I am a Ninja? I watched Ninjago and then I came to know that I am a Ninja...... Power..... golden..... Hey Mom... lightning... Ninja!.....  And Mom, ... water..... defeat..... " असं बरच काही तो मला सांगत राहिला. 
      गंभीरपणाने चर्चा करणारा आरव परत एकदा (एकदाचा!) 6 वर्षांचा झाल्याचा मला आनंद झाला. "Hey Mom, now I am going to do some Ninja Training. Do you know Ninjas have to train every day!" असं म्हणून तो आत पळाला आणि मी एक नि:श्वास टाकून शांतपणे माझ्या detective serial कडे वळले. 

Friday, February 9, 2018

Flowing thoughts Flow state

      एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा ओघवता प्रवास मला खूप आवडतो. Free flowing transition मला अतिशय भावतं आणि मी करत असलेल्या सगळ्या गोष्टीत मी ते शोधायचा, करायचा प्रयत्न करत असते. Architect म्हणून spaces design करत असताना कायम मला दोन spaces च्या मधलं transition design करायला खूप आवडतं. ओडिसी नृत्यात तर एका pose मधून तरलपणे दुसऱ्या pose मध्ये जाणे ही त्या नृत्यप्रकाराची खासियत आहे. पुस्तके वाचतानाही ओघवती भाषाशैली आणि उलगडत जाणारी गोष्ट याच्या मी प्रेमात पडते. या blog च्या निमित्ताने माझ्या मनातल्या तरंगत्या विचारांचा कागदपर्यंतचा (laptop पर्यंतचा) हा एक प्रवास! मध्यंतरी अचानक flow या शब्दाचा अजून एक अर्थ असणारी Psychology मधली ही व्याख्या माझ्या वाचनात आली आणि मला ती खूपच भावली.

Flow (psychology)
"In positive psychologyflow, also known as the zone, is the mental state of operation in which a person performing an activity is fully immersed in a feeling of energized focus, full involvement, and enjoyment in the process of the activity. In essence, flow is characterized by complete absorption in what one does, and a resulting loss in one's sense of space and time."

       या flow state मध्ये मी अनेकदा असते, माझ्या जवळच्या, माझ्या आवडत्या अनेक जणांना मी या state मध्ये असलेलं पाहिलेलं आहे. आणि ही state मला प्रचंड आवडते. सगळ्या जगाचे भान विसरून आपल्याला हवी असणारी एखादी गोष्ट झोकून देऊन करणे या संकल्पनेच्या मी प्रेमात आहे. त्या state मध्ये असताना जी एक झिंग चढते आणि ते काम संपल्यावर मनात जे शांत वाटतं ती अनुभवायचीच गोष्ट आहे. अर्थात त्यात नेहमीच आपल्या मनासारखं उतरवता येत नाही याची चिडचिड, काही वेळा तोकडा अनुभव आणि काही वेळा इच्छा असूनही हवा तितका वेळ flow state मध्ये घालवता येत नाहीये ही जाणीव हे सगळं फारच क्लेषकारक असतं. पण तो त्या process चा एक भाग आहे.
       मला flow state मध्ये घेऊन जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये 'लिखाण' हाही एक छंद आहे ही गोष्ट मला तशी बरीच उशिरा कळली. शाळेत असताना लिखाण म्हणजे निबंध लिहिणे असा समीकरण असल्यामुळे तेव्हा, "हे काही आपल्याला जमत नाही" अशी ठाम समजूत होती. आपल्या मनात येतं ते आपल्याला हवं तसं (मार्कांची फिकीर न करता आणि ठराविक साच्यात न बसवता) कागदावर उतरवायची मजा जेव्हा कळली तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटलं. 
      असं मी माझ्यापुरतं काही वेळा लिहिते. आजूबाजूच्या अनेक गोष्टींबद्दल मला काय वाटलं, त्याबद्दलचं माझं मत, एखादा प्रसंग, जुनी आठवण, एखादी भावलेली व्यक्ती अशा काही गोष्टींबाबत अगदी आतून काहीतरी लिहावासं वाटतं. त्या निमित्तानी हा blog. माझ्या मनातले तरंग Cloud मार्फत तुमच्यापर्यंत... नक्की वाचा आणि मला तुमचा अभिप्राय कळवत रहा. 

एक अनुभव