काही दिवसांपूर्वी मी एक blog post लिहिली. त्यात माझ्या 6 वर्षांच्या मुलाने मला विचारलेले काही कठीण प्रश्न आणि त्याची उत्तरे देताना माझ्या मनाचा उडालेला गोंधळ याबद्दल मी लिहिलं होतं. ते वाचून खूप जणांनी मला अभिप्राय पाठवला. आपल्या लिखाणाबद्दलचा अभिप्राय वाचायला मला नेहमीच आवडते. Thanks all for that. त्या अनेक comments मधला सामान धागा होता की, "आपल्या मुलांची ही नवीन पिढी अतिशय smart आहे. अनेक गोष्टींबद्दल ते सतत विचारतात आणि आपल्याला त्याची योग्य उत्तरे द्यावी लागतात. आपण आपल्या लहानपणी असे काही प्रश्न विचारलेले आठवत नाही." एरवीही जेव्हा काही मित्र मैत्रिणी एकत्र जमतात आणि आपापल्या मुलांचा विषय निघतो तेव्हा आजकालची मुले आपल्यापेक्षाही किती smart आहेत असा एक common चर्चेचा विषय असतो.
मला नेहमीच यावर काय बोलावं कळत नाही. मी या विचाराशी पूर्णतः सहमत नाही पण असहमत ही नाही त्यामुळे मी नेहमी गप्प बसते किंवा नुसतीच मान डोलावते. मला नेहमी वाटतं की प्रत्येकच पिढी तिच्या आधीच्या पिढीपेक्षा smart असते. प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये काळाचा एक overlap असतो. आणि काळरेषा बघता तो आधीच्या पिढीच्या शेवटी येतो तर नवीन पिढीच्या सुरुवातीला. भोवतालची परिस्थिती, जीवनपद्धती, नवीन तंत्रज्ञान, सामाजिक वैविध्य, अनेक नवीन विषयांचे exposure या सगळ्यामुळे एखाद्याच्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम होत असतो. आधीची पिढी लहानाची मोठी होत असताना या सगळ्या गोष्टी बदलत जातात आणि ते या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत, नवीन शिकत, घडत जातात. पण नवीन पिढीसाठी ही बदललेली परिस्थितीच starting point असल्यामुळे ते या परिस्थितीत चाचपडत नसून एकदम comfortable असतात. त्यामुळे ही नवीन पिढी आपल्यापेक्षा अधिक smart आहे असे वाटते.
आजकालची मुले चारचौघात हुशारीने बोलतात, आपल्याला कोड्यात टाकणारे प्रश्न विचारतात याचे कारण आपणच त्यांना तशा प्रकारे निर्भीडपणे विचार करायला, व्यक्त व्हायला शिकवलेले आहे. आपल्या लहानपणी कित्येक घरांमधून मुलांसाठी जे नियम असत त्यांनी त्यांचा चौकसपणा मारला जात असे. मोठ्या माणसांना असे बोलू नये, या विषयावर प्रश्न विचारू नयेत असे सतत सांगितले जायचे. त्यामुळे आता आपली मुले अशी मनमोकळेपणानी वागली की त्याचे अप्रूप वाटते.
माझे पणजी पणजोबा वाईजवळच्या एका खेड्यात राहत असत. त्या काळी माझ्या आजोबांना 4 थी ची scholarship मिळाली म्हणून शिक्षणासाठी ते वाई सारख्या जरा मोठ्या गावात राहायला गेले आणि तिथेच आजोबांचे बालपण गेले. नोकरीच्या निमित्ताने माझे आजोबा पुण्यात राहिले आणि माझा बाबा तिथे मोठा झाला. मी आणि दादा दोघेही शिक्षण नोकरीच्या निमित्ताने दिल्ली, बंगलोर सारख्या आणखी मोठया शहरात राहिलो. आणि आता आमची मुले अमेरिकेत वाढत आहेत. प्रत्येक नवीन पिढी नवीन आणि अधिक मोठ्या गावाला राहायला गेली आणि त्यानिमित्ताने येणारे नवीन अनुभव घेत शहाणपणा शिकत गेली. आधीची पिढी नवीन शहरात, देशात चाचपडत, शिकत राहिली आणि त्यामानाने प्रत्येकाची मुले आहे त्या शहरात सरावून नवीन आव्हाने स्वीकारत नवीन ठिकाणी जात राहिली. प्रत्येक पिढीने नवीन शोध लावत, नवीन परिस्थितीशी जुळवून घेत, अधिकाधिक प्रगती करत पुढे जाणे हा निसर्गाचा नियम आहे. आदिमानवापासून ते आपल्यापर्यंत झालेल्या उत्क्रांतीमध्ये ते दिसून येते.
या सगळ्यात एक गोष्ट मात्र आपण नेहमी विसरतो की नवीन पिढी जसं नवीन काही शिकत आहे तसच जुनं काही मागेही टाकत आहे. प्रत्येक माणसाकडे स्वतःच्या मर्यादित आयुष्यात जर एक ठराविक माहितीचा साठा असेल तर नवीन शिकण्यासाठी जुन्या काही गोष्टी मागे सारल्या जातात. आजकाल सगळ्यांना वाटतं की लहान मुले smartphone, computer आणि एकूणच सगळे तंत्रज्ञान किती सहजतेने वापरतात. आपल्याला काही हे जमत नाही. पण आधीच्या पिढीने तितक्याच सहजतेने फोन, TV, oven, food processor वापरले आहेत. त्याच्या आधीच्या पिढीने गॅसची शेगडी, मिक्सर आणि त्याच्या आधीच्या पिढीने चूल आणि पाटा वरवंटा. आत्ताच्या पिढीला पाटा वरवंटा हातात दिला तर हा नेमका कशासाठी वापरायचा असतो हे सुद्धा कळणार नाही. आदिमानवने तर स्वतः हत्यारे बनवली आणि आग तयार केली. आपल्याला त्यासाठी hardware चे दुकान आणि आधुनिक पद्धतीने आपल्याआप पेटणारी गॅस ची शेगडी यावर अवलंबून रहावे लागते. आता याला नवीन पिढी खूप smart आहे म्हणावे की खूप मागास?
भारतातून अमेरिकेत राहायला आल्यावर माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. कशाला काय म्हणतात, उच्चर कसे करतात, कुठे कसे वागतात, सामाजिक किंवा सांस्कृतिक वेगळेपण या आणि अशासारख्या असंख्य गोष्टीत मी अजूनही चाचपडत असते आणि त्यातून सतत नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आता मुले शाळा, classes च्या निमित्ताने बाहेरच्या जगात जायला लागल्यापासून कित्येक नवीन गोष्टी मला त्यांच्या मार्फत कळायला लागल्या आहेत. आणि ही तर सुरुवात आहे. त्यांचं जग जसजसं मोठं होत जाईल तसतसं त्यांच्या ज्ञानात, अनुभवात नवीन भर पडत जाईल. त्यातल्या कित्येक गोष्टी माझ्यासाठी अगदी नवीन असणार आहेत आणि अजून खूप चाचपणं बाकी आहे. मुलं आपल्यापेक्षा smart वाटणार आहेत. पण चार पावसाळे जास्त पाहिल्यामुळे मला मिळालेलं शहाणपण त्यांना नसेल. मुलं अर्धी भारतीय आणि अर्धी अमेरिकन असली तरी अमेरिकेत वाढत असल्याने त्यांना भारतीय गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव नसेल. मी लहानाची मोठी होताना जे संदर्भ, व्यक्ती, चालीरीती मला भावल्या आणि त्यामुळे मी समृद्ध झाले त्यांची ओळख त्यांना नसेल. त्यामुळे मला वाटतं कोणती पिढी smart हे ठरवण्यापेक्षा काही कमीपणा किंवा भीती न बाळगता मुलांकडून नवीन गोष्टी शिकत राहणे आणि माझी पाळेमुळे जिथे जिथे जाऊन पोचली आहेत त्या सगळ्या जुन्या गोष्टींची त्यांना ओळख करून देणे एवढेच माझ्या हातात आहे.
No comments:
Post a Comment